शिक्षणाच्या प्रकाशवाटेचा वाटाड्या हरपला…

कृपया शेअर करा

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर सर यांच्या निधनाची बातमी समजली तेंव्हा मनाला अतीव दुःख झाले. महात्मा जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलेल्या शिक्षणाच्या प्रकाशवाटेचा एक महत्त्वाचा वाटाड्या त्यांच्या निधनामुळे काळाच्या पडद्याआड गेला. चिपळूणकर सरांनी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून बजावलेली भूमिका आणि त्यानंतर शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांनी केलेले मार्गदर्शन मोलाचे आहे. पुढील कित्येक पिढ्यांना त्यांचे कार्य सदैव मार्गदर्शन करीत राहील यात शंका नाही. चिपळूणकर सर अलिकडच्या काळात वृद्धापकाळामुळे थकले होते पण तरीही त्यांचे असणे खुपच आश्वासक होते. त्यामुळेच राज्याच्या शिक्षण क्षेत्रात सध्या सुरु असलेल्या अवैज्ञानिक प्रयोगांच्या पार्श्वभूमीवर सरांची एक्झिट प्रकर्षाने जाणवतेय. महाराष्ट्रातील आजची जी पिढी पस्तीशी पार करुन चाळीशीकडे अग्रेसर आहे त्या पिढीला वि. वि. चिपळूणकर सरांची नव्याने ओळख करुन देण्याची गरज नाही. ज्या काळात महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात मोठे संक्रमण होत होते. महाराष्ट्राचे ‘देशाची शैक्षणिक प्रयोगशाळा’ म्हणून नाव गाजत होते, विद्यार्थी घडविणाऱ्या शाळा असणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख पक्की होत होती. त्या काळात राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राची धुरा चिपळूणकर सरांकडे होती. त्यांनी याकाळात आखून दिलेल्या धोरणामुळेच राज्याची शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदिपक प्रगती झाली. ती केवळ ठराविक वर्गापुरती मर्यादित नव्हती तर शाळेच्या कक्षेबाहेर असणारे अनेक घटक यामुळे शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आले. शहरांपुरतातच मर्यादित असणारा शिक्षणाचा प्रकाश वाड्या-वस्त्यांपर्यंत झिरपला.

चिपळूणकरांच्या काळातील विद्यार्थ्यांची ही पिढी एका अभूतपुर्व शैक्षणिक संक्रमणातून गेली आहे. वैचारीक जाणिवा आणि नेणिवा समृद्ध झालेली ही पिढी आहे. जवळपास सर्वच क्षेत्रात या पिढीने आपापले सर्वोच्च योगदान देऊन राज्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. यामागे चिपळूणकर सरांनी आखून दिलेले शैक्षणिक धोरण आहे हे मान्य करावेच लागेल.

विद्याधर विष्णु अर्थात वि. वि. चिपळूणकर यांचा जन्म १३ एप्रिल १९२९ रोजी विर्ले-पार्ले येथे झाला. त्यांचे सर्व शिक्षण मुंबईतच झाले. माध्यमिक शिक्षक, शासकीय विद्यानिकेतचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, प्राचार्य अशा पदांवर काम करताना त्यांनी १९७६ ते १९८६ या काळात राज्याचे शिक्षणसंचालक म्हणून काम पाहिले. दर्जेदार आणि गुणवत्ताप्रधान शिक्षण देण्यास त्यांचे प्राधान्य होते. बालभारतीच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. चिपळूणकर समितीच्या अहवालामुळे ते अनेकांना माहित आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात लागू केलेल्या अनेक योजनांमुळे शिक्षणाला एक दिशा मिळाली. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी शासकीय विद्यानिकेतन ही संकल्पना मांडली. तत्कालिन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी हि संकल्पना उचलून धरली. अर्थात यामागे चिपळूणकर सरांना मांडणी, त्यांची कल्पकता आणि आश्वासकता होती हे वेगळे सांगण्याची गरज नाही. ‘ उद्धरावा स्वये आत्मा’ हे विद्यानिकेतनचे ब्रीदवाक्य त्यांनी सुचविले होते.

त्यांच्या कार्यकाळातच रात्र शाळांचे निकाल कमी लागतात म्हणून त्या बंद कराव्यात अशी शिक्षण क्षेत्रातील काही धुरीणांनी सुचना केली. त्यावेळी युतीचे राज्य होते. तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि शिक्षणमंत्री सुधीर जोशी यांनी चिपळूणकर सरांच्या नेतृत्वाखाली याबाबत विचार करण्यासाठी एक समिती नेमली. त्यावेळी रात्रशाळा का सुरु ठेवाव्यात यासाठी सरांनी जोरदार युक्तिवाद केला. सर म्हणाले होते, “दिवसभर कष्ट करून थकलेले, खिशात थोडा पैसा खुळखुळणारे हे तरुण तो चैनीसाठी, जुगारात, व्यसनात वाया न घालवता शाळेत येतात हे काय कमी महत्त्वाचे आहे? त्यांनी शाळेच्या परिसरात नुसती एक चक्कर जरी टाकली, तरी त्यांना बोर्डाने सर्टिफिकेट दिले पाहिजे.” सरांचा हा परखड पण व्यवहार्य युक्तिवाद मान्य झाला. परिणामी रात्रशाळा आजही सुरु आहेत. परिस्थितीच्या रेट्यामुळे मुळ प्रवाहात राहून शिक्षण घेऊ न शकणारे अनेकजण आज रात्रशाळांमध्ये शिक्षण घेऊन आपले आयुष्य समृद्ध करीत आहेत. अर्थात यामागे केवळ चिपळूणकर सरच आहेत हे विसरता कामा नये. परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची सुरुवातीलाच दमछाक होऊ नये यासाठी पहिली आणि दुसरीची परीक्षाच रद्द करण्यासारखा धाडशी निर्णय देखील त्यांनीच घेतला. त्यामुळे गळतीची समस्या देखील बऱ्यापैकी आटोक्यात आणता आली.

चिपळूणकर सरांचे शिक्षणक्षेत्रातील महत्त्वाचे योगदान म्हणजे सावित्रीबाई फुले दत्तक योजना. बहुजन समाजातील अनेक होतकरु मुलींना शिक्षणाचे पंख लाभले. ज्या माऊलीने आयुष्यभर तथाकथित भद्र समाजाची अवहेलना सोसून, सामाजिक स्थितीच्या विरोधात बंड पुकारुन स्त्रीशिक्षणाचा मार्ग प्रशस्त केला, त्या सावित्रीमाईच्या नावाने दत्तक योजना सुरु करुन सरांनी शिक्षणक्षेत्रात त्यांचे एक भव्य स्मारकच जणू उभा केले.

सरांनी शिक्षणक्षेत्राला एक दिशा दिली. अध्ययन आणि अध्यापनाचे एक अभूतपुर्व सुत्र दिले. विद्यार्थी हा केंद्रबिंदून समजून शिक्षणाला गती दिली. एक शिक्षक कैक पिढ्या घडवितो. चिपळूणकर सरांनी अशा शिक्षकांच्या कैक पिढ्या घडविल्या. एवढेच नाही तर नव्या काळाशी सुसंगत अशा अध्यापनाच्या पद्धती विकसित करण्यासाठी अनेकांना प्रेरीत केले. शाळेच्या कक्षेबाहेरील समाजातील मुलांना शाळेत आणले त्यांचे हे कार्य महाराष्ट्र कधीही विसरु शकणार नाही. त्यांचे हे कार्य अधिक गतीने आणि डोळसपणे सुरु ठेवणे हिच खरी सरांना श्रद्धांजली ठरेल.

सुप्रिया सुळे, खासदार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading