पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर: कर्तव्यदक्ष व लोककल्याणकारी शासक

Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar
कृपया शेअर करा

संसदेच्या आवारात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा एक अतिशय बोलका पुतळा आहे. प्रजेच्या हितासाठी अतिशय दक्ष असणाऱ्या या राजमातेचा पुतळा जेंव्हा दिसतो तेंव्हा त्यांच्यासमोर मी आपोआप नतमस्तक होते. कुशल सेनानी, प्रजेच्या हितासाठी दक्ष असणारी राज्यकर्ती, लोकांच्या सोयीसुविधांची काळजी घेत त्यांच्यासाठी पायाभूत सुविधांचे जाळे उभारणारी माऊली अशी अनेक रुपे डोळ्यासमोर उभी राहतात. अहिल्यादेवींच्या नावाचं गारुड अगदी लहानपणापासून माझ्यावर आहे. या कुतुहलातून त्यांच्याविषयी जे काही वाचनात आलं त्याचे एक छोटं टिपण मी तयार केलंय.

देशाच्या नव्हे तर जगाच्या इतिहासातही महिला शासकांची अगदी बोटावर मोजण्याएवढी संख्या आहे. परंतु यामध्ये ज्या महिला राज्यकर्त्यांचे कर्तृत्त्व पटकन डोळ्यात भरते आणि आजही ते समर्पक आहे त्यातीलच एक नाव म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर… युरोपातील इतिहातज्ज्ञ त्यांच्या कर्तृत्त्वाची तुलना पश्चिमेकडील कॅथरीन द ग्रेट ( मार्गारेट) या राणीशी करतात. अर्थात अहिल्यादेवींचे कार्य कोणत्याही तुलनेपेक्षा सरस आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त चोंडी येथे माझे जाणे होत असते. तेथून येताना एक अफाट उर्जा मी मनामध्ये साठवून येते. अहिल्यादेवींचे कार्यच एवढे प्रेरणादायी आहे.

अहिल्यादेवींचा जन्म ३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या गावी झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे चोंडीचे पाटील होते. माणकोजी शिंदे हे त्या काळात देखील प्रगत विचारांचे होते. त्यांनी त्या काळात देखील स्त्रीशिक्षणाचे महत्त्व ओळखून अहिल्यादेवींना लिहायला आणि वाचायला शिकविले होते. घरातून मिळालेला हा प्रगत विचारांची शिदोरी त्यांना पुढे आयुष्यभर पुरली. तो काळ युद्धांच्या धामधुमीचा होता. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा वटवृक्ष होऊ लागला होता. थोरल्या बाजीरावांच्या काळात नव्याने उदयास आलेली सरदारांची एक मोठी फौज स्वराज्याच्या विस्तारासाठी कार्यरत होती. यामध्येच एक मोठे नाव होते मल्हारराव होळकर यांचे. त्यांच्याकडे माळवा प्रांताची जहागिरी होती. मल्हारराव मोहिमेवर असताना त्यांनी आपला मुक्काम चोंडी येथे ठेवला असता त्यांना तेथील मंदिरात खेळणारी एक चुणचुणीत मुलगी दिसली. तिच्यातील भावी प्रशासकाचे गुण त्यांनी हेरले आणि त्याच क्षणी तिला आपली सुन मानून त्यांनी माणकोजी शिंदे यांच्याकडे आपल्या खंडेराव या मुलासाठी मागणी केली. अशा रितीने शिंद्यांची लेक होळकरांची सुन झाली.

अहिल्यादेवी होळकरांना मल्हाररावांनी युद्धकलेचेही धडे दिले. त्यांनी हातात शस्त्रे घेऊन युद्धातही भाग घेतला. त्याचबरोबर धार्मिक रितीरिवाज, व्रतवैकल्ये आणि शासनव्यवस्थेची कर्तव्येही अहिल्यादेवींनी मोठ्या निष्ठेने पार पाडली. कुम्हेरच्या लढाईल १७५४ साली त्यांचे पती खंडेराव होळकर धारातीर्थी पडल्यानंतर त्यांनी सती जाण्याची तयारी केली. पण मल्हाररावांनी त्यांना थांबविले. वडीलांसारख्या सासऱ्यांची विनंती त्यांनी मान्य केली. खंडेरावांच्या पश्चात अहिल्यादेवींनी आपले संपुर्ण आयुष्य प्रजेच्या कल्याणासाठी वाहिले. पुढे मल्हाररावांच्या मृत्युनंतर त्यांनी संस्थानाच्या सर्व कामाची सुत्रे आपल्या हाती घेतली. त्या सैनिकांमध्ये अतिशय लोकप्रिय होत्या. मल्हाररावांनंतर अहिल्यादेवींच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यास सैनिक उत्सुक असत. सैन्याच्या कवायतीचे अंबारीतून निरिक्षण करीत असताना त्या स्वतः शस्त्रास्त्राने सज्ज असत.

मल्हाररावांच्या मृत्युनंतर जेंव्हा त्यांना शासक म्हणून दर्जा देण्यास काही लोकांनी आडकाठी आणली. पण पेशव्यांनी जेंव्हा त्यांना शासक म्हणून दर्जा दिला तेंव्हा अहिल्यादेवींनी आपल्या विरोधकांनाही सन्मानाने परत बोलावून त्यांना दरबारात योग्य ती पदे दिली. समोरच्या व्यक्तीच्या क्षमतांची पारख करुन त्याचा योग्य तो वापर करुन घेण्याचे अद्भुत कसब त्यांच्याकडे होते. अहिल्यादेवी या न्यायप्रिय शासक होत्या. त्यांच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेली कोणतीही व्यक्ती रिक्तहस्ताने परत गेली नाही. त्यांनी स्वतः कधीच पडदाप्रथा पाळली नाही. त्या दररोज जनतेचा दरबार भरवत असत. जनतेची गाऱ्हाणी त्या रोज ऐकत. त्यांचा निवाडा करीत असत. त्यांच्या या कृतीमुळेच त्यांना रयत दैवताप्रमाणे मानत असत. खुद्द नाना फडणवीसांनीही एके ठिकाणी अहिल्यादेवी या एखाद्या देवतेसारख्या असल्याचा उल्लेख केला आहे. अहिल्यादेवी अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. तेथे भाविकांचा होणारी गैरसोय पाहून त्यांनी धर्मशाळा, विहिरी, रस्ते अशा सुविधा निर्माण केल्या. अनेक ठिकाणी नदीकिनारी घाट बांधले. त्यांचे हे कार्य इतिहासात अजरामर झाले आहे.

अहिल्यादेवी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत अग्रेसर राहिल्या. त्याकाळी वारस म्हणून एखादे मुल विधवांना दत्तक घ्यायचे असल्यास त्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण केल्या जात असत. त्यांची आर्थिक कोंडी केली जात असे. पण अहिल्यादेवींनी दत्तकविधान प्रक्रियेतील झारीतील शुक्राचार्य बाजूला सारले. त्यांच्या संस्थानात कोणतीही विधवा आपल्या इच्छेनुसार दत्तक घेऊ शकत असे. एका प्रसंगात तर त्यांच्या मंत्र्याने दत्तकविधान नामंजूर केल्यानंतर स्वतः अहिल्यादेवींनी पुढाकार घेऊन ते मंजूर तर केलेच शिवाय त्या कार्यक्रमात स्वतः हजेरी लावली. याशिवाय त्यांचे मोठे कार्य म्हणजे पतीच्या मृत्युनंतर त्याची मिळकत पत्नीला मिळावी असा कायदाच त्यांनी केला होता. त्यांनी प्रजेसाठी शेती, आरोग्य आणि शिक्षणाच्या अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या.

अहिल्यादेवी या काळाची पावले ओळखणाऱ्या शासक होत्या पेशव्यांची इंग्रजांशी वाढणारी जवळीक पाहून त्यांनी त्याबाबत पेशव्यांना सावध करणारे पत्र लिहिले होते. त्यावेळी पेशव्यांनी त्या पत्राची दखल घेतली असती तर कदाचित इतिहास वेगळा दिसला असता. इतिहासाने या लोकोत्तर कार्य असणाऱ्या महान राजमातेची अतिशय कृतज्ञापुर्वक दखल घेतली आहे. चोंडी येथे त्यांच्या जन्मस्थानी आजही लाखोंचा जनसागर त्यांना अभिवादन करण्यासाठी लोटतो. राजमाता अहिल्यादेवी जनतेच्या मनामनात आजही त्यांच्या कार्यामुळे जीवंत आहेत. त्यांना विनम्र अभिवादन.

सुप्रिया सुळे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading